‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ किनगाव येथे राज्यस्तरीय शुभारंभ; फडणवीसांचा ‘लखपती दीदी’ संकल्प

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ किनगाव येथे राज्यस्तरीय शुभारंभ; फडणवीसांचा ‘लखपती दीदी’ संकल्प

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १७ :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आजपासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ाची सुरुवात झाली. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किनगाव (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे झाला.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रत्येक गावात पोहोचवून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

‘लखपती दीदी’चा संकल्प

या अभियानांतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. जिल्हा बँकांमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्या माध्यमातून महिला उद्योगधंदे उभे करून स्वावलंबी होतील. “राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा आमचा संकल्प आहे,” असा ठाम निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वाभिमान आणि लोकसहभागाची नवी दिशा

मुख्यमंत्री म्हणाले, “हे अभियान फक्त योजना पोहोचविण्यापुरते मर्यादित नसून, ग्रामस्थांना स्वाभिमानाने जगायला शिकवणारे आहे. लोकसहभाग हाच या अभियानाचा गाभा आहे.”

या उपक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना गावागावात राबवून ग्रामपंचायती व गावे ‘मॉडेल’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती व 40 हजार गावे या अंतर्गत विकसित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉ. कल्याण काळे व संदीपान भुमरे, आमदार संजय केणेकर, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण, आमदार श्रीमती संजना जाधव यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

👉 ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ ग्रामीण भागाला नवसंजीवनी देत स्वावलंबी आणि स्वाभिमानी गावांची उभारणी करणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.