‘मी आयुक्त होणार’ उपक्रमातून उस्मानपुरा मनपा शाळेची आयुक्तांच्या निवासस्थानी प्रेरणादायी भेट

‘मी आयुक्त होणार’ उपक्रमातून उस्मानपुरा मनपा शाळेची आयुक्तांच्या निवासस्थानी प्रेरणादायी भेट
‘मी आयुक्त होणार’ उपक्रमातून उस्मानपुरा मनपा शाळेची आयुक्तांच्या निवासस्थानी प्रेरणादायी भेट

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ :- मनपा प्राथमिक शाळा उस्मानपुरा येथील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. ‘मी आयुक्त होणार’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मनपा आयुक्त मा. जी. श्रीकांत यांच्या ‘जलश्री’ या निवासस्थानी भेट देत प्रेरणादायी संवाद साधला.

कधीकाळी बंद होण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आज नवचैतन्याने फुलली आहे. आयुक्तांच्या Smart School to Best School या प्रकल्पामुळे शाळेला नवसंजीवनी मिळाली. मराठी माध्यमातील इयत्ता तिसरीपर्यंतची पटसंख्या केवळ ७ वरून तब्बल १६४ वर पोहोचली असून, CBSE पद्धतीचे वर्गही सुरू आहेत. ‘पुन्हा भरणार मराठी शाळा’ या चित्रपटातील संवादाप्रमाणे ही शाळा खऱ्या अर्थाने पुन्हा भरली आहे.

सकाळी विद्यार्थ्यांनी मैदानावर खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल यांसारखे खेळ खेळत उत्साह व्यक्त केला. ‘चूहा-बिल्ली’, ‘डोंगराला आग लागली पळा पळा’, ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’ अशा पारंपरिक खेळांमध्येही शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मनसोक्त सहभाग घेतला. त्यानंतर सर्वांनी एकत्रित निसर्गभोजनाचा आनंद लुटला.

आयुक्तांच्या आगमनानंतर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. “मी आयुक्त होणार” अशी चित्रे, फुलांची व मैदानाची रेखाटने काढत विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने रंगवली. स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवत अभिवादन केले असता, आयुक्तांनीही तितक्याच प्रेमाने “तुम्ही माझ्या घरी आलात, स्वागत मी करणार” म्हणत विद्यार्थ्यांचे मन जिंकले.

अनन्या हिने शाळेतील स्मार्ट साहित्य, क्रिकेट टर्फ व मैदानावरील सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले. पंकजाने ‘संख्या ओळख’चे मॅजिक सादर केले, तर प्रज्वलने “मी आयुक्त होणार” हे चित्र दाखवत आपल्या स्वप्नाची प्रामाणिक मांडणी केली. आयुक्तांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात छोट्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा पाळणा नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. गणपती बाप्पाच्या गाण्यावर तसेच ‘आकाशगंगा’ या गीतावर विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. आयुक्तांनी मुलींना शेजारी बसवून त्यांच्याशी संवाद साधत प्रेमळ आपुलकी दाखवली.

ही भेट उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख मा. अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी मा. गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. शिक्षणाधिकारी मा. भारत तिनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे तसेच मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व शिक्षक शुभांगी कदम, सीमा कदम, विद्यूलता गोरे, पूजा कुमार उपस्थित होते.

शाळा बदलली, विचार बदलले… आता स्वप्नं मोठी झाली!