महापालिका मुख्यालय होणार स्वच्छ व शिस्तबद्ध; रिकाम्या जागांचा नियोजनबद्ध वापर करा – आयुक्त अमोल येडगे

महापालिका मुख्यालय होणार स्वच्छ व शिस्तबद्ध; रिकाम्या जागांचा नियोजनबद्ध वापर करा – आयुक्त अमोल येडगे
महापालिका मुख्यालय होणार स्वच्छ व शिस्तबद्ध; रिकाम्या जागांचा नियोजनबद्ध वापर करा – आयुक्त अमोल येडगे

महाराष्ट्र वाणी

 संभाजीनगर(औरंगाबाद) दि. २५ :- महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी आज सकाळी महानगरपालिका मुख्यालय परिसराची पाहणी करत मुख्यालय व परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि शिस्तबद्ध ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच मुख्यालय परिसरातील रिकाम्या जागांचा नियोजनबद्ध व उपयुक्त वापर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

आयुक्तांनी महानगरपालिका मुख्यालय परिसर, साईड मार्जिन तसेच अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली. यावेळी साईड मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य, विटांचे तुकडे, फरशी तसेच वापरात नसलेल्या विविध वस्तू पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सर्व साहित्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यकतेनुसार शेड उभारून दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. महानगरपालिका मुख्यालय परिसर स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत नागरिक व कर्मचारी यांच्या सोयीसाठी उपलब्ध जागांचा योग्य वापर व्हावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यालयातील लेखा विभाग तसेच उपायुक्त-१ कार्यालयाची पाहणी करून कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. विविध विभागांतील कामकाज अधिक कार्यक्षम, सुव्यवस्थित आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उप आयुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता संजय कोंबडे, सहाय्यक आयुक्त लता पुजारी आदी उपस्थित होते.

“स्वच्छ, सुबक आणि नियोजनबद्ध महापालिका मुख्यालयासाठी प्रशासन आता अधिक सक्रिय झाल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.”