महानगरपालिका रणधुमाळीत भाजपचा कठोर निर्णय — २२ पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता!

महानगरपालिका रणधुमाळीत भाजपचा कठोर निर्णय — २२ पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता!
महानगरपालिका रणधुमाळीत भाजपचा कठोर निर्णय — २२ पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता!

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर | दि. ४ जानेवारी २०२६

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक–२०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक शिस्तीचा कठोर निर्णय घेत शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पक्षाच्या अधिकृत धोरणांना व निर्णयांना डावलून काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने तब्बल २२ पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई केली आहे.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ४ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले. महानगरपालिका निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त, धोरणे व निर्णयांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असते. मात्र काही पदाधिकाऱ्यांच्या कृतींमुळे पक्षाची प्रतिमा आणि संघटनात्मक शिस्त बाधित होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सखोल चर्चा झाल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांचे प्राथमिक सदस्यत्व तसेच त्यांच्याकडे असलेली सर्व पदे तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, संघटनात्मक शिस्त अबाधित राखण्यासाठी ही कारवाई केल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रीकांत बुंदे, कुणाल मराठे, तेजस व्यवहारे, गीता आचार्य, राजेंद्र वाहुळे, बबनराव कदम, प्रशांत भदाणे पाटील, मदन काका नवपुते, गणेश गडबाळ, अरविंद डोणगावकर, राजू खुळे, सुदाम साळुंके, प्रमोद नवडे, संकेत प्रधान, श्रीमंदारी, देवदत्त सिसंत, प्रमोद दिवेकर, राजश्री पगार, संतोष घुमाळ पाटील, सौ. आरती गुट्टलकर, सौ. ऋतु अग्रवाल आणि राहुल चाबुकनकर यांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे भाजपने “पक्षशिस्तीशी तडजोड नाही” असा स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा सध्या शहरातील राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

— वाचकांसाठी हा इशारा की राजकारणात शिस्त हीच खरी ताकद!