"मराठवाडा पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित – विभागीय आढावा बैठकीत काँग्रेसचा निर्धार"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १६ :- आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून, ‘ही निवडणूक आम्ही लढणार आणि जिंकणारच!’ असा ठाम निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्षांची विभागीय आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस माजी मंत्री अनिस अहमद निरीक्षक म्हणून उपस्थित होते, तर खासदार डॉ. कल्याण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीचे आयोजन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण डोणगावकर व शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ यांनी केले.
बैठकीत मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी, मतदार नोंदणी अभियान, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि प्रचार नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या सर्व स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी एकदिलाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
“मराठवाड्यातील तरुण, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, आणि पदवीधर वर्गात काँग्रेसचा विश्वास पुन्हा दृढ करण्याची वेळ आली आहे. लोकशाही मूल्ये व संविधान रक्षणासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे,” असे निरीक्षक अनिस अहमद यांनी बैठकीत सांगितले.
खासदार डॉ. कल्याण काळे यांनीही या वेळी बोलताना, “काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. लोकशाही, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर आम्ही लढणार. मराठवाडा काँग्रेसने पुन्हा आपले बळ दाखवावे,” असे आवाहन केले.
बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्याचा निर्धार आता स्पष्ट झाला आहे!