मनपा निवडणुकीत ऑल इंडिया पँथर सेनेची निर्णायक एन्ट्री — १० प्रभागांतून ‘नवा पर्याय’, सत्तासमीकरण बदलणार!

मनपा निवडणुकीत ऑल इंडिया पँथर सेनेची निर्णायक एन्ट्री — १० प्रभागांतून ‘नवा पर्याय’, सत्तासमीकरण बदलणार!
मनपा निवडणुकीत ऑल इंडिया पँथर सेनेची निर्णायक एन्ट्री — १० प्रभागांतून ‘नवा पर्याय’, सत्तासमीकरण बदलणार!

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि १९ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेनेने स्वतंत्र राजकीय भूमिका जाहीर करत शहराच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण केली आहे. संघटनेच्या वतीने १० प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, निवडणूक मूलभूत नागरी प्रश्न आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

युतीसंदर्भातील निर्णयासाठी स्वतंत्र कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, ज्या-ज्या ठिकाणी पँथर सेना निवडणुकीच्या मैदानात उतरेल, तेथे ती किंगमेकिंगच्या भूमिकेत राहील, असे मत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी व्यक्त केले. राज्यातील राजकीय चित्र २४ डिसेंबरपर्यंत स्पष्ट केले जाणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

शहरात सध्या पारंपरिक राजकारण, घराणेशाही आणि जुने प्रस्थापित चेहरे यांच्याविरोधात जनतेमध्ये नाराजी असल्याचे निरीक्षण मांडत, पँथर सेना हीच जनतेसाठी विश्वासार्ह व पर्यायी ताकद ठरणार असल्याचा दावा करण्यात आला. अनेक इच्छुक उमेदवारांनी पँथर सेनेकडे उमेदवारीसाठी संपर्क साधल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, सत्ताधारी पक्षांकडून विकासाच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी धार्मिक मुद्द्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. भाजप सत्तेत आल्यास शहरातील झोपडपट्ट्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असून, एसआरएच्या नावाखाली नागरिकांचे पुनर्वसन नव्हे तर विस्थापन होण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

ही बैठक दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी महाराष्ट्र महासचिव सचिन बाबा तिवारी, महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे, विभागीय आयटी प्रमुख शरद साळवे, जिल्हा नेते अमर लोखंडे, समन्वयक अविनाश हिवाळे, जिल्हाध्यक्ष करणभाई कालियान, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जंगले, जिल्हा सचिव अमोल गडवे, शहराध्यक्ष कुणाल दांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा निवडणुकीत सत्ता ठरवणारी भूमिका कोणाची असेल, याची चाहूल या हालचालींमधून स्पष्टपणे लागत आहे.