"मतदार यादी स्वच्छ नसेल तर निवडणूक होऊ देणार नाही – राज ठाकरे यांचा इशारा"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १९ :- गोरेगाव येथील मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तीव्र भूमिका मांडली. “जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा,” असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज ठाकरे म्हणाले की, “२०१७ मध्येच मी मतदार यादीतील गोंधळ आणि वोटिंग मशीनवर प्रश्न उपस्थित केले होते. पण त्या वेळी अनेकांना त्याचं गांभीर्य समजलं नाही. आज परिस्थिती समोर आली आहे – देशभरातील मतदार याद्यांमध्ये तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची भर झाली आहे.”
त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत विचारलं, “लोकशाही हा देशाचा कणा आहे, आणि तोच जर खालावत असेल तर अशा निवडणुका लढवायच्या तरी कशासाठी? पैसे खर्च करून, लोकांना मतदानासाठी बाहेर काढून काय उपयोग, जर मॅच फिक्सिंग आधीच झालं असेल?”
मनसे अध्यक्षांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
“अशा खोट्या मतदार याद्यांसह निवडणुका म्हणजे लोकशाहीची थट्टा.”
“आम्ही निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारण्याची मागणी करतोय; मग सत्ताधारी यात उडी का घेत आहेत?”
“विलास भुमरे जाहीर भाषणात म्हणतात – मी २० हजार मतदान बाहेरून आणलं. इतकी हिंमत यांना कशी होते?”
“गुजरातचा प्रभाव महाराष्ट्रावर आणण्यासाठी मतदार याद्या बिघडवल्या जात आहेत.”
“मुंबई–महाराष्ट्र अदानी-अंबानीना आंदण देण्यासाठी तयार केला जातोय.”
“मराठी माणसाच्या अस्तित्वावर गदा आली तर शांत बसणार नाही.”
“निवडणूक खरी हवी, सत्तेचा प्रश्न नाही. जनादेश खरा हवा.”
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले,
“प्रत्येक मतदार सतर्क राहा. आमची माणसं तुमच्याकडे आली की त्यांना सहकार्य करा. मतदार यादी स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही. लोकशाही वाचवणारच.”
मतदार यादीतील घोळ उघड झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवी लढाई पेटणार का? पाहा पुढे काय घडतं!