भरदिवसा घरफोडी करणारा सवयीचा गुन्हेगार गजाआड; २.७० लाखांचे सोनं हस्तगत!

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)३० जून :- पाचोड पोलीस व छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आडूळ गावात भरदिवसा झालेली मोठी घरफोडी उघडकीस आली असून, कूख्यात गुन्हेगार किशोर तेजराव वायाळ (वय ४६, रा. मेरा बुद्रूक, ता. चिखली, जि. बुलढाणा) याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून तब्बल २.७० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
१८ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी आडूळ गावातील एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील सहा तोळे सोने, चांदीची पैजन आणि ₹१.४० लाख रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. पंडीत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने किशोर वायाळ याला अटक करण्यात आली.
तपासादरम्यान त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
एक राणी हार (२०.३ ग्रॅम)
एक नेकलेस हार (१२.७ ग्रॅम)
वितळवलेल्या सोन्यापासून तयार केलेली ४५ ग्रॅम वजनाची धातू
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे आणि स्था. गु. शाखा पोनि. श्री. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडीत, उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
संयुक्त तपास व काटेकोर नियोजनामुळे घरफोडीचा गुन्हा उघड झाला; पोलिसांचे काम कौतुकास्पद!