“बाळासाहेबांवर बोलण्याआधी भाजपने आपली औकात ओळखावी!” – उद्धव ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १३ :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकारच्या पाकिस्तानविषयक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. अबुधाबी येथे होणाऱ्या हिंदुस्थान–पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध दर्शवत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “देशभक्ती ही व्यापाराची वस्तू नाही. जवानांचे बलिदान लक्षात न ठेवता पाकिस्तानसोबत सामना खेळणे ही देशभक्तीची थट्टा आहे.”
पाकिस्तानसोबत सामना म्हणजे देशभक्तीचा व्यापार – उद्धव ठाकरेंची टीका
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले – “पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांची हत्या केली. आपल्या सैनिकांनी शौर्य दाखवत पाकिस्तानला धडा शिकवला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात देशभर संताप होता. मात्र अचानक काय झाले की युद्धभूमीवर लढलेल्या पाकिस्तानसोबत आता क्रिकेट मॅच खेळली जाते? हे देशभक्तीचे अवमूल्यन आहे.”
त्यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला – “अमित शहा, राजनाथ सिंह यांना विचारायचे आहे, पाकिस्तानबरोबर सामना होणार हे तुम्ही थांबवणार आहात का? ज्यांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हटले, त्यांच्याकडे उत्तर आहे का? जर सामना बघायला गेलेला नागरिक देशद्रोही ठरतो, तर मग जय शहालाही देशद्रोही म्हणणार का?”
“बाळासाहेबांवर प्रश्न विचारण्याची भाजपची औकात नाही”
भाजपच्या वक्तव्यांवर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले. त्यांनी थेट इशारा देत म्हटले – “बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली. जावेद मियाँदाद भारतात आला तेव्हा बाळासाहेबांनी ठामपणे क्रिकेट रोखलं होतं. पण मोदीजी नवाझ शरीफच्या घरी केक कापायला गेले होते. त्यामुळे बाळासाहेबांवर बोट ठेवण्याची भाजपची औकात नाही. भाजपने आधी आपली मर्यादा ओळखावी.”
“देशभक्ती व्यापारापेक्षा मोठी आहे”
ठाकरे म्हणाले – “जवान सीमारेषेवर लढतात, शहीद होतात. तरी केंद्र सरकारसाठी व्यापार देशापेक्षा मोठा वाटतोय का? हिंदुत्वाची ढाल घेऊन राजकारण करणाऱ्यांना विचारतो, तुमच्या लेखी देशाची किंमत आहे का? बाळासाहेबांची ठाम भूमिका होती – पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोवर पाणी काय, कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत.”
‘सिंदूर’ मोहिमेवरही टीका
भाजपच्या कार्यक्रमांवरही ठाकरे यांनी ताशेरे ओढले. “पहलगाममध्ये माता-भगिनींच्या अंगावर विध्वंस ओढवल्यानंतर भाजप ‘सिंदूर वाटप’ करतो, दांडिया आयोजित करतो. ही देशभक्तीची थट्टा नाही तर काय?” असा प्रश्न त्यांनी केला.
“पंतप्रधानांनी सामना रद्द करावा”
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आवाहन केले – “देशाची प्रतिष्ठा व्यापारापेक्षा मोठी आहे. पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोवर क्रिकेट सामना खेळणे योग्य नाही. पंतप्रधानांनी ठामपणे सांगावं की हा सामना होणार नाही.”