प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि,१८ :- विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे .प्रशासन हे पारदर्शक आणि लोकाभिमुख करून ते सुशासन करण्यासाठी संवाद कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
कन्नड येथील डीडीएल लॉनवर ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे एक दिवसीय उपविभागीय स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवा हमी आयुक्त श्री किरण जाधव,कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, मार्गदर्शक सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर ,खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ , डॉ.शोएब मोहम्मद डॉ. उलफत परदेसी डॉ. मेघा शेवगण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या प्रशिक्षण धोरण अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अध्यायवत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना विविध सेवा सुविधा पारदर्शक, वेळेत आणि दर्जेदार उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशिक्षित केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य प्रशासकीय यंत्रणेत ग्रामीण स्तरावर महसूल विभागाची भूमिका महत्वाची . आहे यामध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) हे दोन दुवे थेट जनतेशी जोडलेले असून, त्यांना 'प्रशासनाचा कणा' म्हणून ओळखले जाते. शेतीविषयक नोंदींपासून ते विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पडत असताना दैनंदिन जीवनात शेतकरी बांधव, विविध प्रकारच्या नागरिक, महिला, कामानिमित्त संपर्क येत असतो तर हा संपर्क होत असताना नागरिकांच्या शंका समाधान आणि त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी संवाद कौशल्य महत्वपूर्ण असून अंतरिक तळमळीने ग्रामीण जनतेला मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी काम करावे. यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचा अंगीकार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .या प्रशिक्षणातून अद्यावतंत्रज्ञानाचा वापर ,विविध शासन निर्णय, नियमावली याचा अभ्यासही असणे आवश्यक आहे तरच नागरिकांना आपण वेळेत सुविधा देऊ शकतो असे मार्गदर्शनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
प्रशिक्षणातील मार्गदर्शक संजय कुंडेटकर यांनी महसूल विषयक विविध कायद्याचे मार्गदर्शन केले यामध्ये जमीन महसूल अधिनियम 1966 यामधील खंड दोन, तीन आणि चार यामधील असणाऱ्या विविध बाबीचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच वारसा हक्क, कायदे तुकडे बंदी, व यातील सुधारणा यावर मार्गदर्शन केले .
सेवा हमी विधेयक याबाबत सेवा हमी आयुक्त किरण जाधव यांनी नागरिकांना सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याची विहित कालावधी होण्याच्या आत उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सेवा हमी विधेयकाच्या अंतर्गत होणाऱ्या अपील व अपील होऊ नये या संदर्भात महसूल अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
डॉ. शोएब मोहम्मद डॉ. उलफत परदेसी व मेघा सेवगन यांनी कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयीचे मार्गदर्शन करून ताण-तणवाचे व्यवस्थापन करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे .याबाबत मार्गदर्शन करून आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती या कार्यक्रमात दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गोरड उपविभागीय अधिकारी यांनी केले .