पोलीस आयुक्तालयात“मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन” चे उदघाटन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- पोलीस तपासाची गुणवत्ता आणि गती वाढविण्यासाठी आज (दि.19 ऑगस्ट 2025) रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त मा. प्रवीण पवार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात "मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन" चे उदघाटन करण्यात आले.
ही व्हॅन परिमंडळ-1 कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून गंभीर गुन्ह्यांच्या तपासात तात्काळ वैज्ञानिक मदत मिळणार आहे.
मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनमध्ये गुन्हे तपासासाठी आवश्यक अत्याधुनिक किट्स उपलब्ध आहेत. यामध्ये –
1. क्राईम सीन कॉर्डनिंग व प्रोटेक्शन किट
2. जनरल इन्व्हेस्टिगेशन किट
3. पुरावे संकलन व पॅकिंग किट
4. DNA कलेक्शन (Sexual Assault) किट
5. गन शॉट रेसिड्यू टेस्ट किट
6. आर्सन इन्व्हेस्टिगेशन किट (गॅस डिटेक्टरसह)
7. सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन किट
8. कॅमेरा व बारकोड स्कॅनर
9. हँड हेल्ड सर्च लाईट इ.
या व्हॅनमध्ये 2 सहाय्यक रासायनिक विश्लेषक, 4 वैज्ञानिक सहाय्यक, 2 प्रयोगशाळा परिचर व 2 वाहनचालक अशा एकूण 10 तज्ञ व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. गुन्हा घडल्याची माहिती मिळताच हे पथक घटनास्थळी जाऊन पुरावे काळजीपूर्वक गोळा करून तपासकामी उपलब्ध करून देईल.
उदघाटनावेळी पोलीस आयुक्त मा. प्रवीण पवार यांच्यासह पोलीस उपआयुक्त (गुन्हे) मा. रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. मनोज पगारे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, संभाजी पवार, भाऊसाहेब पाटील तसेच फॉरेन्सिक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, “मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनमुळे गंभीर गुन्ह्यांतील पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक शास्त्रीय, जलद व विश्वासार्ह होणार आहे. लवकरच परिमंडळ-2 साठी देखील अशीच व्हॅन उपलब्ध करून दिली जाणार आहे.”