"पप्पांच्या खिशात वहीसाठी १० रुपयेही नसतात!", शेतकरी मुलीचा रोहित पवारांसमोर भावनिक सवाल

महाराष्ट्र वाणी न्युज
चिखली (जि. बुलढाणा) दि ३० जुलै :- गेल्या आठवड्यात आत्महत्याग्रस्त गणेश आणि रंजना थुट्टे या शेतकरी दांपत्याच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान कुटुंबातील आठवीत शिकणारी मुलगी सीमा थुट्टे हिने रोहित पवारांसमोर शेतकरी कुटुंबांची दयनीय स्थिती मांडताना उपस्थितांना अंतर्मुख केले. "शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच का सरकारला जाग येते?" असा थेट प्रश्न करत तिने आपली व्यथा मांडली.
सीमा म्हणाली, “वही घ्यायला सांगितलं तर पप्पांच्या खिशात १० रुपयेही नसतात. शेतकऱ्यांच्या घरात एक दिवस मीठ असतं तर दुसऱ्या दिवशी तेल नसतं. सोयाबीनला क्विंटलला ३-४ हजार भाव आणि तेलाचा लिटर ११५ रुपयांना जातो, हे शेतकऱ्यांना कसं परवडणार?”
या भावनिक उद्गारांवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “तू जे म्हणतेस, तेच खरं आहे. शेतकऱ्यांना दर कमी मिळतात आणि त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही. कापसाला भाव वाढू लागला की सरकार आयात सुरू करतं आणि दर खाली येतात. हीच शेतकऱ्यांच्या दु:खाची खरी मुळे आहेत.”
थुट्टे दांपत्याच्या आत्महत्येवर रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवरूनही तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली होती. त्यांनी लिहिलं, “या आत्महत्येने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, पण सरकार मात्र अजूनही झोपेत आहे. वेळेवर कर्जमाफी झाली असती, तर आज हे कुटुंब आपल्यात असतं.”
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील, तर सरकारने फक्त आश्वासने न देता ठोस पावले उचलली पाहिजेत, हीच या मुलीच्या अश्रूंमधून उमटणारी जोरदार मागणी होती.
शेवटी सरकार जागं होणार तरी केव्हा? शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्याची हीच खरी वेळ आहे!