नेपाळ संकटावर महाराष्ट्र सरकार सक्रिय – अजित पवार म्हणाले, ‘प्रत्येकाला सुरक्षित परत आणू’"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १० :- नेपाळमधील वाढत्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून भारतीय दूतावासाशी थेट संपर्क ठेवून प्रवाशांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती आहे.
या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रत्येकाला सुरक्षितपणे परत आणणे हीच सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
आतापर्यंत ठाणे, पुणे, मुंबई, लातूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील पर्यटक मात्र खासगी वाहनाने परतीचा प्रवास करत गोरखपूर (उत्तर प्रदेश) पर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरातील असल्याचे समजते.
राज्य शासनाने थेट संपर्क साधून अडकलेल्या सर्व प्रवाशांना आवश्यक ती मदत पुरविण्यास सुरुवात केली असून ते सर्व सुरक्षित असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.