निवडणूक खर्चाचा हिशोब १५ फेब्रुवारी पर्यंत सादर करा – मां.आयुक्त यांचे आवाहन
✍️ महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रचारासाठी झालेल्या एकूण खर्चाचा तपशील 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास संबंधित सदस्याची सदस्यता रद्द होऊ शकते, असा पुनःच इशारा महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 अंतर्गत दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील नियमानुसार सादर करणे बंधनकारक आहे.या अगोदर दिनांक १९ जानेवारी रोजी झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.उमेदवारांना खर्चाचा हिशोब सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात तसेच नियमानुसार तपासणी व नोंद ठेवण्याची कार्यवाही काटेकोरपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी महापौर व उप महापौर पदा साठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी मां.आयुक्त यांनी
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा खर्चाचा हिशोब दि.१५ फेब्रुवारी पर्यंत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
काल दिनांक १० फेब्रुवारी पर्यंत मुख्य लेखा परीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ८५८ उमेदवार यांच्या पैकी ४७२ उमेदवारांनी निवडणूक खर्च हिशोब सादर केला आहे.
तसेच नव निर्वाचित सदस्या पैकी साधारणत ५०% सदस्यांनी हिशोब सादर केला आहे.
ज्या सदस्यांनी अद्यापही खर्चाचा हिशोब सादर केला नाही त्यांनी विहित मुदतीत हिशोब सादर न केल्यास त्यांची सदस्यता रद्द होऊ शकते यामुळे विहित मुदतीत हिशोब सादर करण्याचे आवाहन आज पुन्हा एकदा मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले आहे.