“नगरपरिषद निकालांनी बदलले राजकारणाचे गणित! महाराष्ट्रात एमआयएमची दमदार एन्ट्री, पहिला नगराध्यक्ष अन् 83 नगरसेवकांची ऐतिहासिक मजल”

“नगरपरिषद निकालांनी बदलले राजकारणाचे गणित! महाराष्ट्रात एमआयएमची दमदार एन्ट्री, पहिला नगराध्यक्ष अन् 83 नगरसेवकांची ऐतिहासिक मजल”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २१ :

महाराष्ट्रातील 288 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात नवे संकेत दिले आहेत. या निवडणुकांत महायुतीने आघाडी घेतली असली, तरी सर्वाधिक चर्चेत राहिला तो एमआयएम पक्षाचा पहिल्यांदाचा दमदार प्रवेश. पहिल्याच प्रयत्नात एमआयएमने एक नगराध्यक्ष आणि तब्बल 83 नगरसेवक निवडून आणत आपली राजकीय ताकद स्पष्टपणे दाखवून दिली आहे.

या निवडणुकीत भाजपा सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणत पहिल्या क्रमांकावर राहिला. शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तिसरा क्रमांक पटकावला. मात्र, पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमने मिळवलेले यश हे अनेक पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड नगरपरिषदेत एमआयएमच्या फरीदा बानो युसुफ पुंजानी नगराध्यक्षपदी निवडून आल्या, यामुळे पक्षाने नगराध्यक्ष पदाचे खाते उघडले. याच नगरपरिषदेत एमआयएमचे 17 नगरसेवक विजयी झाले आहेत. राज्यातील एकूण 14 नगरपरिषदांमध्ये एमआयएमचे 83 नगरसेवक निवडून आल्याची माहिती पक्षाचे नेते नासेर सिद्दीकी यांनी दिली.

निकालानंतर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल म्हणाले,

“ही आमची पहिलीच नगरपरिषद निवडणूक होती. मतदारांनी दिलेला विश्वास आणि आशिर्वाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. काही ठिकाणी 20 ते 50 मतांनी पराभव झाला, तरी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही मोठी मजल मारू शकलो.”

महापालिका निवडणुकांबाबत बोलताना जलिल यांनी स्पष्ट केले की,

“29 महापालिकांच्या निवडणुकांत आमची ताकद अधिक ठिकाणी दिसून येईल. काही पक्ष युतीची भाषा करत आहेत, पण महाराष्ट्रभर चर्चा झाली तरच युतीचा विचार होईल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत फक्त एक पक्ष नव्हे, तर सर्वच पक्ष एमआयएमला मुख्य प्रतिस्पर्धी मानत आहेत.”

हिंदू व दलितबहुल प्रभागांतही एमआयएमकडे सक्षम उमेदवार असल्याचा दावा करत,

“मतदारांनी साथ दिली, तर एमआयएम सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे येईल आणि महापौर बनवणे हे आमचे स्पष्ट लक्ष्य असेल,” असे जलिल यांनी ठामपणे सांगितले.

 नगरपरिषद – नगरपंचायत निकालांचा थोडक्यात आढावा

महायुती : 224 नगराध्यक्ष

महाविकास आघाडी : 50 नगराध्यक्ष

भाजपा : 120 नगराध्यक्ष (सर्वात मोठा पक्ष)

शिंदे गट शिवसेना : 58

राष्ट्रवादी (अजित पवार) : 37

काँग्रेस : 31

राष्ट्रवादी (शरद पवार) : 10

शिवसेना (उद्धव गट) : 10

एमआयएम : 1 नगराध्यक्ष (कारंजा लाड)

🟢 विविध पक्षांतून निवडून आलेले मुस्लिम नगराध्यक्ष

खुलताबाद – आमेर पटेल

सिल्लोड – अब्दुल समीर अब्दुल सत्तार

कन्नड – शेख फरहीन जावेद शेख

भोकरदन – समरीन मिर्झा

पाथरी – आसेफ खान

माजलगाव – मेहरीन बिलाल चाऊस

बाळापूर (अकोला) – डॉ. आफरीन

औसा (उस्मानाबाद) – शेख परवीन

कारंजा लाड (वाशिम) – फरीदा बानो युसुफ पुंजानी

नगरपरिषद निकालांनी दिशा दाखवली आहे; आता खरी राजकीय लढाई महापालिका निवडणुकांत रंगणार असून, एमआयएमचा वाढता प्रभाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे!