धर्मगुरूंचा अपमान व द्वेष पसरवणाऱ्या कृत्यांचा निषेध — दोषींवर तात्काळ कारवाईची जलगाव एकता संघटनेची मागणी
महाराष्ट्र वाणी
जळगाव दि १५ :- देशातील सामाजिक सलोखा, धार्मिक सहिष्णुता आणि संविधानिक मूल्यांना आव्हान देणाऱ्या दोन अत्यंत गंभीर व निंदनीय घटनांमुळे अल्पसंख्याक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा एकता संघटनेने शासन–प्रशासनाकडे तात्काळ व कठोर कारवाईची ठाम मागणी केली आहे.
पहिला गंभीर प्रकार — धर्मगुरूंच्या प्रतिमेचा अमानवी अपमान
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ‘ऋषभ ठाकूर’ नावाच्या व्यक्तीने जमीयत उलमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी साहेब यांच्या छायाचित्रावर लघुशंकेसारखे घृणास्पद कृत्य केल्याचे दिसून येत आहे.
एकता संघटनेच्या मते, हा प्रकार केवळ एका धर्मगुरूंचा अपमान नसून कोट्यवधी मुस्लिम नागरिकांच्या धार्मिक अस्मितेवर थेट हल्ला आहे, तसेच सांप्रदायिक द्वेष भडकवण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे. हा गुन्हा बीएनएस व सायबर क्राईमसारख्या गंभीर कलमांखाली दंडनीय असतानाही अद्याप कठोर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दुसरा मुद्दा — विधानसभेत अपमानास्पद शब्दप्रयोग
महाराष्ट्र विधानसभेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “रहेमान डकेत” असा शब्द वापरल्याचा आरोप एकता संघटनेने केला आहे. संघटनेनुसार हा शब्द कोणत्याही कायदेशीर अथवा प्रशासकीय शब्दसंग्रहाचा भाग नसून एका विशिष्ट समाजाला गुन्हेगार ठरवणारा व कलंकित करणारा आहे. असा शब्दप्रयोग संविधानातील अनुच्छेद 14, 15, 19 व 21 च्या विरोधात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
एकता संघटनेच्या ठाम मागण्या :
1. ऋषभ ठाकूर याच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी.
2. आक्षेपार्ह व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवावा.
3. आरोपीवर कठोरात कठोर कलमांखाली खटला चालवावा.
4. विधानसभेतील अपमानास्पद शब्दप्रयोगप्रकरणी औपचारिक चौकशी करून सार्वजनिक माफी व जबाबदारी निश्चित करावी.
5. भविष्यात जनप्रतिनिधींनी समाजभावना दुखावणारी भाषा वापरू नये यासाठी कडक आचारसंहिता लागू करावी.
इशारा :
एकता संघटनेचे फारूक शेख यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “वेळीच कठोर कारवाई न झाल्यास समाजात उद्भवणाऱ्या कोणत्याही असंतोष, आंदोलन किंवा कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची पूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी शासनाची असेल.”
निवेदन सादर
या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकांत हारकर यांना मझहर पठाण, सलीम इनामदार व फारूक शेख यांनी सादर केले. यावेळी तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात सहभागी :
फारूक शेख, नदीम मलिक, मौलाना रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, मझहर पठाण, सलीम इनामदार, अनीस शाह, अॅड. आवेश शेख, सय्यद इरफान, ताहेर शेख, अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, सईद शेख, जावेद शेख, चिरागोद्दीन शेख आदी उपस्थित होते.
समाजात सलोखा राखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई हाच एकमेव मार्ग आहे, अशी ठाम भूमिका एकता संघटनेने मांडली.