दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका; ग्रामीण भागात धुरळा उडणार!
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २४ :- राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना २७ ऑक्टोबरपर्यंत गट व गणनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
दिवाळीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याने प्रत्यक्ष मतदान नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे.
या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. त्यानंतर नगरपालिका व शेवटच्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका पार पडतील.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रभाग रचना पूर्ण केली आहे. आता मतदार यादीवर काम सुरू असून ८ ऑक्टोबरपर्यंत प्रारुप यादी तयार होणार आहे. ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान हरकती आणि सूचना घेण्यात येतील, तर २७ ऑक्टोबरला मतदान केंद्रनिहाय अंतिम यादी प्रकाशित होईल.
भंडारा, गोंदिया, मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता, उर्वरित ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांसाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या निवडणुका ‘मिनी विधानसभा निवडणुका’ म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील मतदारांचा कल यातून स्पष्ट होणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर राज्याच्या ग्रामीण भागात निवडणुकीची जोरदार रंगत दिसून येणार आहे.