ठाकरे बंधूंचा एकत्र आवाज! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत भव्य मोर्चा

ठाकरे बंधूंचा एकत्र आवाज! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत भव्य मोर्चा

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २७ जून:- राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही ५ जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहेत. ही माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

पूर्वी ६ जुलैला मोर्चा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, नंतर तारीख बदलून ५ जुलै निश्चित करण्यात आली असून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा होणार आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, या निर्णयावर दोन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे.

राऊत म्हणाले की, "शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली लहान मुलांवर हिंदी लादली जात आहे. महाराष्ट्रावरच ही सक्ती होत असून गुजरातला त्यातून सूट देण्यात आली आहे. भाषातज्ज्ञांचंही म्हणणं आहे की, ही जबरदस्ती लहान मुलांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे हे ओझं आम्ही मान्य करणार नाही."

तसेच, मराठी प्रेमी संस्था-संघटनांनी याविरोधात ७ जुलै रोजी मोर्चा जाहीर केला होता. त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आता ठाकरे बंधूंनी एकत्र येत ५ जुलैलाच एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळालं आहे.

 मराठीसाठी लढा आता रस्त्यावर!

(अशा आणखी अपडेटसाठी आमच्यासोबत राहा.)