ठाकरे बंधू पुन्हा एकत्र – मातोश्रीवरच्या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाल!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ५ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या या निवासस्थानी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या तीन महिन्यांतील ही दोघांची पाचवी भेट ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशातून थेट मातोश्रीकडे
संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले होते. या समारंभातून राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह थोडे लवकर बाहेर पडले, आणि काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मातोश्रीवर थेट गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे देखील तेथे पोहोचले. या भेटीदरम्यान दोन्ही कुटुंबांमध्ये आपुलकीचे वातावरण दिसून आले.
ठाकरे कुटुंबीयांचा एकत्रित क्षण
बारशाच्या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. या वेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोसेशनही केलं. आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शेजारी उभे राहिल्याने उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
तीन महिन्यांत पाच भेटी – जुळतेय का समीकरण?
५ जुलै २०२५: विजयी मेळावा – २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर
२७ जुलै २०२५: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर
२७ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थवर
१० सप्टेंबर २०२५: उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली
५ ऑक्टोबर २०२५: संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशानंतर राज ठाकरे मातोश्रीवर
या सलग भेटींमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता अधिक दृढ झाल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जवळीक नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते.
अलीकडील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलं होतं – “एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी.” त्यामुळे ठाकरे बंधूंची एकता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वळण आणू शकते, हे निश्चित.