जींन्सी पोलिसांची ‘फटाका’ सायलेंसरवर धडक कारवाई एक डझनहून अधिक बुलेट जप्त; नागरिकांना मोठा दिलासा

जींन्सी पोलिसांची ‘फटाका’ सायलेंसरवर धडक कारवाई एक डझनहून अधिक बुलेट जप्त; नागरिकांना मोठा दिलासा
जींन्सी पोलिसांची ‘फटाका’ सायलेंसरवर धडक कारवाई एक डझनहून अधिक बुलेट जप्त; नागरिकांना मोठा दिलासा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १६ :

शहरात कर्णकर्कश आवाज करणारे ‘फटाका’ सायलेंसर तसेच नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर जींन्सी पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत एक डझनहून अधिक बुलेट मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

ही कारवाई जींन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.

या विशेष मोहिमेत पीएसआय रवि कदम, भीमराव पवार, संतोष शंकपाळ, मच्छीन्द्र सोनवणे तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी विकास शिरसाठ, सुभाष सैवर आणि फिरोज पठाण यांनी संयुक्त सहभाग घेतला.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा बुलेटस्वारांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड भरल्यानंतर संबंधित वाहने सोडण्यात आली.

विशेषतः मोठा आवाज करणारे ‘फटाका’ सायलेंसर आणि नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवर ही कारवाई केंद्रित होती. यापुढे अशा प्रकारचे सायलेंसर वापरल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून बुलेटच्या त्रासदायक आवाजामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिस व वाहतूक शाखेच्या पथकाचे आभार मानले आहेत. अशा मोहिमा सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जींन्सी पोलिसांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.

अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’!