जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि.३ (औरंगाबाद) :– जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.एस. यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारत पुढील काळात शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन विकासावर विशेष भर देत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप स्वामी यांनी पुष्पगुच्छ देऊन गौडा यांचे स्वागत केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश सिनगारे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नगरपालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त सौरभ जोशी, सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासाला चालना देतानाच शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि जीवनोन्नती उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम केले जाईल.

दरम्यान, माजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव ‘सुखद’ असल्याचे सांगितले. निवडणूक काळ असूनही विकासकामे मार्गी लावण्यात यश आले, तसेच बालविवाह प्रतिबंध आणि प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यावरही भर दिल्याचे त्यांनी सांगितले.

 नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आता विकासाला नवी गती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!