जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महसूल सप्ताहानिमित्त बुधवार दि.३० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान भरगच्च कार्यक्रम

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महसूल सप्ताहानिमित्त बुधवार दि.३० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान भरगच्च कार्यक्रम

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.२८ :- महसूल दिन शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी आहे. यानिमित्त जिल्ह्यात बुधवार दि.३० जुलै ते बुधवार दि.६ ऑगस्ट या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून नागरिकांना सेवा देण्यात येणार आहेत. याउपक्रमात महसूल विभागाच्या गाव ते जिल्हा पातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

महसुल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी जिल्ह्यात यावर्षी दि.३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीद्वारे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड, एकनाथ बंगाळे हे मुख्यालयातून तर अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

*नियोजन याप्रमाणे-*

बुधवार दि.३० जुलै रोजी तालुकास्तरावर महसूली लेखे, जमाबंदी अद्यावतीकरण मोहिम राबविण्यात येईल. त्यात जमाबंदी, ताळमेळ, फेरफार नोंदणी घेणे, प्रलंबित महसूली वसूली करणे, शासकीय जमिनीचा गाव निहाय अहवाल तयार करणे इ. कामे करण्यात येतील. 

गुरुवार दि.३१ रोजी तालुकास्तरावर तक्रार निवारण दिवस पाळण्यात येईल. त्यात दाखल तक्रारीचे निवारण करणे, वारस, खरेदी खताच्या नोंदीच्या तक्रारी निकाली काढणे,जमीन वर्गवारी,क्षेत्र, हक्क नोंदणी, महसूली तक्रारी तसेच इ. सर्व संदर्भ निकाली काढणे इ. कामे करण्यात येतील.

महसूल दिन कार्यक्रम शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावर आयोजीत होईल. त्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार, प्रबोधनपर व्याख्यान व सास्कृंतिक कार्यक्रम.

शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी तालुका स्तरावर वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल. नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने श्रमदान करुन परिसर स्वच्छता मोहिम व परिसरात वृक्षारोपण,प्रत्येक तलाठी सजा येथे सुद्धा स्वच्छता मोहिम, स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेणे, जनजागरण कार्यक्रम इ. उपक्रम राबविण्यात येतील.

सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करुन महसूल कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा सातबारा तयार करण्यात येईल. प्रत्येक अधिकारी,कर्मचारी यांच्या आरोग्याची सखोल तपासणी करुन आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाईल.

मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येईल. तहसिल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजीत करुन रक्तदात्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.

बुधवार दि.६ ऑगस्ट रोजी सेवाहक्क अधिनियम जनजागृती तालुकास्तरावर करण्यात येईल. त्यासाठी गावात शिबीर आयोजित करणे, सेवा केंद्राची तपासणी करणे, गावामध्ये फलक लावणे, सेवा केंद्र, सेतू केंद्र अद्यावतीकरण करणे.

या प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या आयोजनासाठी महसुल कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व सक्रीय सहभाग द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.