जळगाव मोब लिंचिंग प्रकरणी एसआयटी चौकशी, आरोपींना अटक व फास्ट ट्रॅक कोर्टाची वसीम बुऱ्हाण यांची मागणी
अल्पसंख्यांक आयोगाचे उपमुख्य मंत्री अजीत दादांना निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि. १९ :– जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावत येथे अल्पसंख्यांक मुस्लिम युवक सुलेमान रहीम पठाण याची धार्मिक द्वेषातून मोब लिंचिंगद्वारे हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली असून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे राज्य सदस्य वसीम ख्वाजाभाई बुऱ्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की –
ही घटना राज्यघटनेतील अनुच्छेद 21 अंतर्गत नागरिकांना दिलेल्या जीवन व स्वातंत्र्याच्या हक्काचे उल्लंघन आहे.
तसेच नवीन भारतीय न्याय संहिता (BNS 2023) मधील कलम 302, 307, 153A, 295A, 34 अंतर्गत हा गंभीर गुन्हा ठरतो.
मात्र अद्यापही मुख्य आरोपींना अटक झालेली नाही आणि तपासामध्ये निष्पक्षता दिसत नसल्यामुळे अल्पसंख्यांक समाजात तीव्र असंतोष आहे.
त्यामुळे आयोगाने सरकारसमोर खालील मागण्या ठेवल्या आहेत :
1. या प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) नेमून तातडीने चौकशी करावी.
2. सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.
3. प्रकरणाचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जलद न्याय द्यावा.
4. पीडित कुटुंबाला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व संरक्षण पुरवावे.
5. राज्यभर अशा धार्मिक द्वेषातून होणाऱ्या मॉब लिंचिंग घटनांना आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा उभारावी.
वसीम बुऱ्हाण यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, “पीडित कुटुंबाला न्याय मिळणे हीच खरी सामाजिक व घटनात्मक जबाबदारी आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होईल.”
या गंभीर घटनेवरून आता सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 अधिक माहितीसाठी आणि पुढील अपडेट्ससाठी वाचा – महाराष्ट्र वाणी!