घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद!स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
दोन गुन्ह्यांचा छडा, मुद्देमालासह आरोपी अटकेत

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ ऑगस्ट :- फुलंब्री परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तावडीत पकडले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक जिल्ह्यांत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
३१ मार्च २०२५ रोजी फुलंब्री पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. संतोष पांडुरंग फुले (रा. चौका, घाटी हॉटेल समोर) व एकनाथ कचरु पवार (रा. मुर्शिदाबादवाडी) यांच्या घरात चोरट्यांनी कुलुप तोडून रोख रक्कम व दागिने चोरले होते. पोलिसांनी अनुक्रमे गु. र. नं. १७४/२०२५ व १७३/२०२५ अन्वये बीएनएस कलम ३३१(४), ३०५ नुसार गुन्हे नोंदवले होते.
पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय माहिती मिळताच पथकाने आडगाव शिवारात सापळा रचून धुळे-सोलापूर रोडवरील उड्डाणपुलाजवळून बालुसिंग अमरसिंग टाक (वय २८, रा. तिर्थपुरी, ता. घनसांवगी, जि. जालना) यास ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने साथीदारासह गणोरी येथून चोरीची दुचाकी वापरून फुलंब्रीतील दोन ठिकाणी घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वीही लातूर व जालना जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील कार्यवाहीसाठी त्याला फुलंब्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, सहा. पोलीस निरीक्षक पवन इंगळे, अंमलदार वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, चालक संजय तांदळे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांच्या पथकाने केली.
👉 गुन्हेगारीवर ठोस कारवाईचे हे एक उत्तम उदाहरण ठरत आहे!
(अशीच महत्त्वपूर्ण व सत्य बातमी वाचत रहा – महाराष्ट्र वाणीवर!)