गद्दारीचा खरा चेहरा उघड – गोरंट्यालांच्या भाजप प्रवेशावर खोतकरांचा घणाघात; म्हणाले, 'भ्रष्टाचार लपवण्यासाठीचा डाव'

गद्दारीचा खरा चेहरा उघड – गोरंट्यालांच्या भाजप प्रवेशावर खोतकरांचा घणाघात; म्हणाले, 'भ्रष्टाचार लपवण्यासाठीचा डाव'

महाराष्ट्र वाणी न्युज 

जालना दि ३१ जुलै :– काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोरंट्याल यांच्या या निर्णयावर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

"या महाशयांनी पूर्वी मला 'गद्दार' म्हणून हिणवले होते. पण काँग्रेसने त्यांना तीन वेळा आमदारकी दिली, तरी शेवटी भाजपमध्ये जाणे म्हणजे गद्दारी कुणी केली, हे जनतेला दिसतंय," असा टोला खोतकरांनी लगावला.

गोरंट्याल यांच्यावर नगरपालिकेच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्याच चौकश्या सुरू झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे खोतकरांचे म्हणणे आहे. "सध्या सुरू असलेल्या चौकशांपासून वाचण्यासाठी हा राजकीय डाव खेळला गेला आहे," असा आरोपही त्यांनी केला.

गोरंट्याल यांच्या पक्षांतरामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांच्यावर टीका करताना खोतकरांनी स्पष्ट केले की, "जनतेचं भलं सोडून वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्यांना जनता लवकरच जागा दाखवेल."

गद्दारीचा आरोप आता कुणावर? जनतेचा विश्वास जिंकणं हेच खरी लढाई ठरणार आहे!