गट क्र.१७ मधील १५७ प्लॉटधारकांना मिळाला न्याय! — आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

गट क्र.१७ मधील १५७ प्लॉटधारकांना मिळाला न्याय! — आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
गट क्र.१७ मधील १५७ प्लॉटधारकांना मिळाला न्याय! — आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र वाणी न्युज 

फुलंब्री (प्रतिनिधी) दि ४ ऑगस्ट :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गट क्रमांक १७ मधील एन.ए. बोगस प्रकरणाला अखेर न्याय मिळाला असून, या भागातील १५७ प्लॉट धारकांना कायदेशीर बांधकामाचा मार्ग खुला झाला आहे. या यशामागे फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि प्रभावी पाठपुरावा आहे.

कष्टाने जमवलेल्या पैशातून घेतलेले प्लॉट अनेक वर्षांपासून बोगस एन.ए. दाखल्यामुळे अडचणीत होते. ना बांधकाम करता येत होतं, ना विकास आराखड्यात जागा असल्यामुळे कोणतीही कायदेशीर मदत उपलब्ध नव्हती. या अन्यायाविरुद्ध आमदार चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला.

त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं. त्यानंतरही गट क्र.१७ ची सुधारणा करून ती जागा विकास आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी आमदार चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

या परिश्रमातून अखेर शासनाकडून डी.पी. प्लॅनला अंतिम मंजुरी मिळाली असून, आता या १५७ कुटुंबांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर बांधकाम करता येणार आहे.

या सुधारित आराखड्यात केवळ गट क्र.१७ चाच नव्हे, तर संपूर्ण फुलंब्री शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक उद्याने, शैक्षणिक संकुले, खेळाची मैदाने, जलशुद्धीकरण प्रकल्प, दफनभूमी, स्मशानभूमी, व्यापारी संकुल आदी महत्त्वाच्या नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

"आपल्या संघर्षाला अखेर यश मिळालं. गट क्र.१७ मधील प्लॉट धारकांना न्याय मिळवून देताना मनोमन समाधान वाटतंय," अशी प्रतिक्रिया आमदार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केली.

फुलंब्रीच्या नियोजनबद्ध विकासासाठी हे पाऊल एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

 फुलंब्रीच्या विकासासाठी हीच योग्य वेळ!