खाम नदीच्या धर्तीवर सुखना नदीचेही होणार पुनर्जीवन; सांडपाणी रोखून नदीपात्र शुद्ध करण्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्पाच्या कार्यस्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सविस्तर पाहणी केली. आयुक्तांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी सुरू झालेल्या या प्रकल्पांतर्गत चिकलठाणा स्मशानभूमी ते एअरपोर्टच्या मागील पुलापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचे खोलीकरण, रुंदीकरण आणि रॉक पिचिंगचे काम पूर्ण झाले असून, त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
पाहणी दरम्यान आयुक्तांनी शहर अभियंता यांना महत्त्वपूर्ण तांत्रिक निर्देश दिले. खाम नदीमध्ये ज्या प्रकारे सर्व उघडी ड्रेनेज बंद करून स्वच्छ पाणी सोडले जात आहे, त्याच धर्तीवर सुखना नदीचेही पुनर्जीवन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
“सध्या अनेक ठिकाणचे सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जात आहे. यापूर्वी ड्रेनेज सुविधा नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता महानगरपालिका नवीन ड्रेनेज सिस्टीम विकसित करत असल्याने नदी पात्रात उघडं असणारं सर्व सांडपाणी तातडीने बंद करून ते मुख्य ड्रेनेज पाईपलाईनला जोडण्यात यावे,” असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले.
या उपाययोजनांमुळे नदीचे प्रदूषण थांबून सुखना नदीचे पाणी शुद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
हा प्रकल्प पुढील टप्प्यात अधिक वेगाने राबवण्यात येणार असून, चिकलठाणा मार्केट ते मिनी घाटी (जिल्हा रुग्णालय) पर्यंतचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासोबत शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, उद्यान विभागाच्या अभियंता स्वप्नाली माने तसेच सुखना नदी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी जयवंत रघुनाथराव कुलकर्णी उपस्थित होते.
सुखना नदीच्या पुनर्जीवनामुळे शहराला लवकरच स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणाचा नवा श्वास मिळणार आहे!