किल्ले शिवनेरीवरून जरांगे पाटलांचा इशारा : “फडणवीसांनी मराठा आरक्षण मान्य केले नाही तर राजकारण बरबाद होईल!”

किल्ले शिवनेरीवरून जरांगे पाटलांचा इशारा : “फडणवीसांनी मराठा आरक्षण मान्य केले नाही तर राजकारण बरबाद होईल!”

महाराष्ट्र वाणी न्युज 

जुन्नर (पुणे) दि २८ :- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. “मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, अन्यथा येणारे दिवस तुमच्या राजकारणासाठी विनाशकारी ठरतील,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. किल्ले शिवनेरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा आंदोलकांना थांबवणार नाहीत, अशी अपेक्षा होती. पण फक्त एका दिवसाची उपोषणाची परवानगी देऊन सरकारने समाजाची थट्टा केली आहे. यामुळे नाराजीची लाट उसळली आहे. जर सरकारने मोठं मन दाखवून आरक्षणाचा निर्णय घेतला तर मराठा समाज कायमस्वरूपी त्यांचा ऋणी राहील.”

ते पुढे म्हणाले, “परवानगी एक दिवसाची दिल्याने सरकारकडेच निर्णय घेण्याची ताकद आहे, हे स्पष्ट झालं. कोर्टाचा दाखला देऊन आमच्या भावना दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी गरीब मराठ्यांच्या वेदना लक्षात घेऊन आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. समाज उपकार कधीही विसरणार नाही.”

सरकारला उद्देशून त्यांनी चेतावणी दिली की, “आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. अगदी गोळ्या घातल्या तरी मराठा समाज मागे सरकणार नाही. एक दिवसाची परवानगी दिली असल्यास, त्या एका दिवसातच सरकारने मागण्या मान्य कराव्यात.”

यावेळी जरांगे पाटलांनी समर्थकांना आवाहन केले की, “आझाद मैदानावर गर्दी किती जमली यापेक्षा आपल्याला आरक्षण महत्त्वाचं आहे. ५ हजार लोक आले तरी किंवा लाखो लोक जमले तरी, लढा हा मागण्यांसाठीच आहे.”

👉 “मराठा आरक्षणावर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर त्याचे राजकीय परिणाम गंभीर असतील,” असा पुन्हा एकदा जरांगे पाटलांचा इशारा शिवनेरी किल्ल्यावरून घुमला आहे.