"कबुतरखाना, मांसबंदी आणि निवडणुका — समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न!" : राज ठाकरे

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई १४ ऑगस्ट :- मुंबईत आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर कबुतरखाना वाद, मांसबंदी आदेश आणि सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंनी स्पष्ट केलं की, दादर कबुतरखान्यावर माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असताना, आंदोलन झालं आणि राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा त्यात सहभागी झाले. "लोढा हे राज्याचे मंत्री आहेत, कुठल्या धर्माचे प्रतिनिधी नाहीत," असा टोला त्यांनी लगावला. कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
१५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कत्तलखाना व मांसविक्री बंदीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं, हा प्रकार हास्यास्पद आहे." त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना ही बंदी न पाळण्याचे निर्देश दिले.
सरकारवर आरोप करताना राज ठाकरे म्हणाले, "निवडणुका तोंडावर आल्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधी हिंदी सक्ती, आता कबुतरांचा मुद्दा."
✍️ महाराष्ट्र वाणी — लोकांच्या हक्कासाठी ठाम आवाज