कटकटगेट परिसराच्या विकासाला गती! आमदार प्रदीप जैस्वाल यांची पाहणी; तातडीने उपाययोजनेचं आश्वासन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जून : मध्य विधानसभा मतदारसंघातील कटकटगेट परिसरातील विविध समस्यांबाबत नागरिकांच्या मागणीनुसार आमदार प्रदीप जैस्वाल यांनी नुकतीच सदर परिसराला भेट दिली. भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी अनेक महत्त्वपूर्ण समस्या आमदारांसमोर मांडल्या.
इस्लाम दरवाजाचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक सुलभ शौचालयाची गरज, जुन्या पुलाची दुरुस्ती तसेच परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उद्यान उभारणीची मागणी नागरिकांनी केली.
या सर्व मागण्या गांभीर्याने घेत, येत्या दोन दिवसांत महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे आश्वासन आमदार जैस्वाल यांनी दिले.
या दौऱ्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच कटकटगेट परिसरात विकासकामांना गती मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत
आहे.