“ओबीसी आणि मागास मुस्लिमांसाठी 57 शासननिर्णय मिळवणारे शब्बीर अन्सारी – संघर्षाला भावपूर्ण अभिवादन”
✍️ महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- ओबीसी आणि मागास मुस्लिम समाजाला संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी शब्बीर अन्सारी यांचे योगदान अतुलनीय आहे. शिक्षण आणि संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांनी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले, असे मत ‘रीड अँड लीड फाउंडेशन’चे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय प्रवक्ते मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी व्यक्त केले.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रणेते शब्बीर अन्सारी आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नदवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गल्लीतून ते दिल्लीपर्यंत संघर्ष करत शब्बीर अन्सारी यांनी मागास ओबीसी समाजाला एकत्र केले आणि सरकारकडून तब्बल 57 शासननिर्णय (GR) काढून घेतले. आज मुस्लिम समाजातील अनेक वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे, त्यामागे त्यांचा मोठा वाटा आहे.” तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात डॉ. अशोक केवटे यांनी डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या लेखनातून वंचित घटकांना न्याय मिळवून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार केला, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. व्ही. मस्के होते. प्रास्ताविक प्रो. नवनाथ गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. रामेश्वर वर्शिल यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. एन. एम. करडे यांनी मानले.
यावेळी डॉ. प्रज्ञा रुईकर साल्वे, डॉ. एस. पी. बुधवंत, डॉ. प्रेमराज वाघमारे, डॉ. संजय खरात, डॉ. गौतम घाडगे, डॉ. सुनील सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
👉 संघर्ष, विचार आणि शिक्षणाच्या बळावर समाजपरिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.