एमआयएम तिकीटावरून किराडपुरात राडा; पोलिस बंदोबस्त तैनात, तणाव निवळला
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- एमआयएमकडून सोशल मीडियावर चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होताच किराडपुरा परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसाधारण जागेसाठी युवा शहराध्यक्ष मोहम्मद असरार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या जागेसाठी हाजी इसाक खान हे प्रबळ दावेदार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहम्मद असरार यांनी परिसरात नागरिकांच्या भेटीसाठी रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. मात्र याच वेळी हाजी इसाक खान यांच्या समर्थकांनी संतप्त होत असरार यांना धक्काबुक्की केल्याचा तसेच त्यांच्या गळ्यातील हार काढून फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जीन्सी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दोन्ही गटांतील कार्यकर्ते जीन्सी पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते.
यावेळी एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजिद (बिल्डर) यांनी घटनास्थळी दाखल होत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हाजी इसाक खान यांच्या समर्थकांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त करत, त्यांनी पक्षासाठी सातत्याने काम केले असून प्रत्येक निवडणुकीत एमआयएमला मते मिळवून दिल्याचा दावा केला. निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्याचे तिकीट कापण्यात आल्याचा आरोप करत त्यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, वाढता जमाव पाहता हाजी इसाक खान स्वतः गाडीवर उभे राहून समर्थकांना शांततेचे आवाहन केले. कायदा हातात न घेता संयम राखण्याचे त्यांनी आवाहन केले. वार्डातील जनतेचा निर्णय आपल्याला मान्य राहील, असे सांगत त्यांनी जमाव शांत केल्यानंतर परिस्थिती निवळली. कोणतीही तक्रार नोंदवता दोन्ही गट आपापल्या मार्गाने निघून गेले.
या घडामोडीनंतर आता एमआयएमचे वरिष्ठ नेतृत्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १२ मध्ये कटकट गेट, किराडपुरा शरीफ कॉलनी, रहेमानिया कॉलनीचा काही भाग, बाबर कॉलनी, नाहीद नगर व यशोधरा कॉलनीचा समावेश आहे. या प्रभागात दोन सर्वसाधारण जागांसाठी एमआयएमचे उमेदवार जाहीर झाले असून, सर्वसाधारण महिला व ओबीसी महिला आरक्षित जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत.