एन-7 सिडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ – 14 नागरिक जखमी, 35 हून अधिक मोकाट कुत्र्यांना चावा

एन-7 सिडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ – 14 नागरिक जखमी, 35 हून अधिक मोकाट कुत्र्यांना चावा
एन-7 सिडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ – 14 नागरिक जखमी, 35 हून अधिक मोकाट कुत्र्यांना चावा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- एन-7 सिडको अयोध्यानगर परिसरात रविवारी (दि. 17 ऑगस्ट) पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला चढवला. या घटनेत लहान मुले, महिला व वयोवृद्ध पुरुष असे एकूण 14 जण जखमी झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता या कुत्र्याने परिसरातील 30 ते 35 मोकाट कुत्र्यांनाही चावा घेतला, त्यामुळे पुढील काही दिवसांत या कुत्र्यांचाही पिसाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

एन-7 पोलीस कॉलनी, ग्रीव्हज कॉलनी, अयोध्यानगर राममंदिर, बी-1, सी-1, सी-2, जी-1 त्रिवेणीनगर, महादेव मंदिर आदी परिसरात या कुत्र्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. या भागात मुकुल मंदिर शाळा, जिगीशा शाळा, रमाबाई महानगरपालिका शाळा, सिडको पोलीस स्टेशन तसेच गरवारे कम्युनिटी सेंटर असल्याने नागरिक दहशतीखाली आले आहेत.

शाळा परिसर, रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी सतत फिरणारे हे कुत्रे पिसाळल्यास मोठ्या प्रमाणावर मानवहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत संभ्रमात आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहर जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कृष्णा तांगडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात, “परिसरातील सर्व कुत्र्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते,” अशी मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही यावर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाला केले आहे.

“सिडको परिसरातील नागरिकांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”