आंतरजिल्हा घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद – ४ गुन्हे उघडकीस, पोलिसांची शिताफीने कारवाई!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ जुलै :- चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून एका आंतरजिल्हा सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिकलठाणा येथील पुजा अंजिक्य पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार ३० मार्च २०२५ रोजी दाखल झाली होती. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. विनायक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे वामन नंदु राठोड (रा. फंड वस्ती, शिरूर, पुणे) या सराईत गुन्हेगाराचा शोध घेतला. तो वारंवार ठिकाणं बदलत असल्याने शोध घेणे कठीण होत होते. मात्र पथकाने तीन दिवस स्थानिक परिसरात वेशांतर करून सापळा रचत २६ जुलै रोजी पहाटे ३ वाजता त्याला ताब्यात घेतलं.
प्राथमिक चौकशीत त्याने शेंद्रा, देवळाई, घारदोन (चिकलठाणा हद्दीत) आणि अंतवाली खांडी (पाचोड पोलीस ठाणे हद्दीत) अशा चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असल्याने पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनायक राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सुधीर मोटे, दिपक पारधे, श्रीमंत भालेराव, कासिम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, योगेश तरमळे, जिवन घोलप, शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.
पोलीसांचे सतर्क आणि शिताफीने केलेले कामगिरीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा!