अस्वच्छतेचा कळस! छत्रपती संभाजीनगरमधील १२ हॉटेल, कॅन्टीन व मिठाई दुकानांचे परवाने निलंबित
अन्न व औषध प्रशासनाची ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत कारवाई; ब्लिंकिट स्टोअरपासून हॉटेल आणि मिठाई दुकानांपर्यंत तपासणीत गंभीर त्रुटी उघड
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राबविलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरासह जिल्ह्यातील १२ खाद्य आस्थापनांवर कारवाई केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि अन्न सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याचे तपासणीत आढळल्याने संबंधित आस्थापनांचे परवाने व नोंदणी तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
या विशेष तपासणी मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाई दुकाने, डेअरी तसेच ऑनलाईन डार्क स्टोअरची तपासणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी कच्चे आणि शिजवलेले अन्न एकाच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले. तसेच कीड नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसणे, स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीत आवश्यक खबरदारी न घेणे अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
1. ब्लिंकिट स्टोअर – उस्मानपुरा-इटखेडा
2. एमआयटी कॅन्टीन – बीड बायपास
3. हॉटेल न्यू राज दरबार – देवळाई
4. राजदरबार मराठा हॉटेल – गारखेडा
5. श्री हरी दूध डेअरी अँड बेकर्स – देवळाई
6. रॉयल हॉटेल – नेहरू चौक, छावणी
7. केजीएन केटरर्स – पहाडसिंगपुरा
8. एस. के. सवेरा हॉटेल – शहाबाजार
9. जयश्री फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट – वैजापूर
10. टेके फरसाण अँड बाबा मिसळ पाव सेंटर – वैजापूर
11. श्री चामुंडा बिकानेर स्वीट – आळंद, फुलंब्री
12. एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज कॅन्टीन – वाळूज एमआयडीसी
१५ दिवसांची मुदत; परवानगीशिवाय व्यवसाय सुरू करता येणार नाही
कारवाई करण्यात आलेल्या संबंधित व्यावसायिकांना आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत स्वच्छता, अन्न साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांनुसार आवश्यक सुधारणा करणे बंधनकारक राहणार आहे.
मुदतीनंतर प्रशासनाकडून फेरतपासणी केली जाईल. सर्व त्रुटी दूर झाल्याची खात्री झाल्यानंतर आणि सक्षम प्राधिकाऱ्यांची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच संबंधित आस्थापनांना पुन्हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.