अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा : 'शहर सुंदर करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा' – पालकमंत्री शिरसाट

अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा : 'शहर सुंदर करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा' – पालकमंत्री शिरसाट
अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा : 'शहर सुंदर करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा' – पालकमंत्री शिरसाट

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १२ जुलै :– शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला राज्याचे इमाव कल्याण व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विधानपरिषद सदस्य संजय केणेकर, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मनपा आयुक्त श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शहर विकास आराखड्यानुसार ही कारवाई सुरू असून, परवानाधारक बांधकामे तोडली जाणार नाहीत. मात्र चिन्हांकन करून नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. मध्यबिंदू संदर्भातील आक्षेपांसाठी नगररचना आणि भूसंपादन विभाग संयुक्त मोजणी करतील. काही ठिकाणी प्रार्थना स्थळांची बांधकामे स्वतःहून काढण्याचे सहकार्य मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, सर्व विभाग समन्वयाने ही मोहिम राबवत आहेत. मंत्री अतुल सावे यांनी अतिक्रमण काढून रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मधोमध आलेले वीजखांब त्वरित हलवावेत, आणि भूमिगत वीजवाहिन्यांसाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश दिले.

आ. केणेकर यांनी मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद लाभत असल्याचे सांगून अधिकाऱ्यांचे कौतुक केले. आ. जयस्वाल यांनी शहर विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. आ. अनुराधा चव्हाण यांनी परवानाधारक मिळकतींचे पुनर्वसन आणि अतिक्रमण रोखण्यासाठी जागांचा त्वरित विकास करण्याची सूचना केली.

पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, मोहिमेत बाधितांना म्हाडा मार्फत घरे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परवानाधारक बांधकामे असल्यास त्या नागरिकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. संयुक्त मोजणीच्या आधारे योग्य तो निर्णय घेतला जाईल. सर्व धर्मीयांचा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, एकत्रित प्रयत्नातून हे शहर सुंदर करण्याचा उद्देश साध्य होईल. तसेच शहरातील महामार्ग प्राधिकरणातील रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 शेवटी, अतिक्रमणमुक्त आणि नियोजनबद्ध शहर हेच विकासाचे खरे लक्षण!

"आपली माती, आपली बातमी – महाराष्ट्र वाणी."