अंभई मंडळातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आमदार अब्दुल सत्तार यांची पाहणी; शेतकऱ्यांना दिला धीर
महाराष्ट्र वाणी न्युज
अंभई, सिल्लोड दि. १८ :- सिल्लोड तालुक्यातील अंभई मंडळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत आज आमदार अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अंभई मंडळातील अंभई, केळगाव, उंडणगाव, नानेगाव, शेखपूर, खुल्लोड, पांगरी आदी गावांच्या शिवारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सत्तार यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान आमदार सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांना धीर देत शासनस्तरावर तातडीने मदतीचे प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणीवेळी तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अशोक शाखावार यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी, याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
👉 अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर उभे राहावे, हीच शेतकऱ्यांची मागणी आहे.