JSW कंपनीतील ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायरिंग चोरीचा पर्दाफाश! तीन आरोपी जेरबंद; १४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

बिडकीन पोलिसांची मोठी कारवाई; ६०० किलो कॉपर वायरिंगसह चोरीसाठी वापरलेले १० लाखांचे वाहनही जप्त

JSW कंपनीतील ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायरिंग चोरीचा पर्दाफाश! तीन आरोपी जेरबंद; १४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

बिडकीन दि २६ :- बिडकीन डीएमआयसी परिसरातील JSW Motors कंपनीच्या दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील लाखो रुपये किमतीचे कॉपर वायरिंग चोरी करणाऱ्या टोळीचा बिडकीन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण ६०० किलो कॉपर वायरिंग आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे औद्योगिक परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

ट्रान्सफॉर्मर फोडून कॉपर वायरिंग लंपास

दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी बिडकीन डीएमआयसी परिसरातील JSW Motors कंपनीच्या २२० केव्ही स्विचयार्डजवळ असलेल्या ५०० केव्हीए क्षमतेच्या दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायरिंग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. चोरीदरम्यान ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडले, तसेच कंपनीच्या सीमा तार कुंपणाचेही नुकसान करण्यात आले होते. या घटनेमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्याला चोरीचा माल विक्रीसाठी नेताना पोलिसांचा सापळा

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. चोरी केलेले कॉपर वायरिंग विक्रीसाठी आरोपी पुण्याला घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

पोलिसांनी चितेगाव टोलनाक्याच्या अलीकडे सापळा रचला. यावेळी MH-05-BS-9009 क्रमांकाचे वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये चोरीस गेलेले कॉपर वायरिंग आढळून आले. वाहनातील तीन जणांचा या चोरीत सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.

अटक करण्यात आलेले तीन आरोपी

१. अन्सार मंजूर शहा (वय २४), रा. साईनगर, चितेगाव.

२. संगम संजय मुळे (वय २९), रा. महादेव नगर, उदगीर, जि. लातूर; ह.मु. सहयोगनगर, बिडकीन.

३. गोविंद सोमेश्वर भोपळे (वय २५), रा. फुलेनगर, माजलगाव, जि. बीड; ह.मु. मोंढा नाका, बालाजीनगर, छत्रपती संभाजीनगर.

१४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे.

- JSW कंपनीच्या दोन ट्रान्सफॉर्मरमधून चोरी केलेले ६०० किलो कॉपर वायरिंग – किंमत ४ लाख ८० हजार रुपये.

- चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेले MH-05-BS-9009 क्रमांकाचे वाहन – किंमत १० लाख रुपये.

एकूण जप्त मुद्देमाल : १४ लाख ८० हजार रुपये.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी JSW कंपनीतील ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर वायरिंग चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत चोरीस गेलेले संपूर्ण कॉपर वायरिंग हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक राजू तडवी, पोहेकॉ वाल्मीक निकम, योगेश नाडे, संदीप धनेधर, अमोल मगर, वादेज शेख, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे आणि स्वप्नील दिलवाले यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्यात सुरू आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित