CJP नेते अभिजित दिपके यांच्या घरी बच्चू कडूंची भेट; महायुतीत चर्चांना उधाण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- CJP कडून भाजपविरोधी भूमिका सातत्याने मांडली जात असताना, शिवसेना (शिंदे गट)चे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी CJP नेते अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्याची शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याने भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते बच्चू कडू यांनी अभिजित दिपके यांची घेतलेली भेट हा वेगळा राजकीय संदेश मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा अभिजीत दिपकेंच्या घरी भेट दिली होती आता आमदार बच्चु कडू यांनी अभिजीत दिपकेची भेट घेतली आहे.
बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण केले होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यामुळे शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.
आपल्या आक्रमक आंदोलनशैलीसाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांच्या या भेटीमागे नेमका काय हेतू आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. ही केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे काही राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
दरम्यान, या भेटीवेळी शहराध्यक्ष कुणाल राऊत, महेश बडे, सुधाकर शिंदे, संकेत खापर्डे, विश्वदीप कारंजीकर आणि जुबेर शेख उपस्थित होते.
बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण
"मी शेतकरी, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी शेकडो आंदोलने केली आहेत. या आंदोलनांदरम्यान माझ्यावर अनेक वेळा लाठीमार झाला असून आजपर्यंत माझ्याविरुद्ध साडेतीनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मी स्वतःला एक आंदोलक मानतो आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर अभिजित दिपके यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले," असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.