48 तासांत खुनाचा पर्दाफाश; 2 आरोपी जेरबंद! ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- (ग्रामीण) पोलीस दलाने अत्यंत गंभीर, गुंतागुंतीचा व क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा अवघ्या 48 तासांत उघडकीस आणत मोठे यश मिळवले आहे. गोदावरी नदीच्या पुलाखाली पोतडीत सापडलेल्या अनोळखी मयताचा थरारक खून उघड करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
दि. 15/12/2025 रोजी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाखाली एका संशयित पोतडीत गळ्याला फास दिलेल्या व हातपाय बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पो.स्टे. पैठण येथे गु.र.नं. 440/2025 अन्वये कलम 103(1), 238 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसींग राजपुत यांना स्वतः मार्गदर्शन करून गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान सातत्याने आढावा घेतला गेला.
स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील व बाहेरील पोलीस ठाण्यांमधील मिसिंग रजिस्टर, फरार आरोपींची माहिती तपासली. शेवगाव (जि. अहिल्यानगर) पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मृतदेहाचे फोटो दाखवले असता मयत गदेवाडी येथील असल्याची माहिती मिळाली. पुढील चौकशीत मयताची ओळख कृष्णा पंढरीनाथ धनवडे (रा. गदेवाडी) अशी पटली. तो मूकबधिर असल्याचेही निष्पन्न झाले, ज्यामुळे तपास अधिक आव्हानात्मक ठरला.
गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना मयताचा भाचे जावई सागर रामेश्वर केसापुरे (वय 20, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याच्यावर संशय बळावला. पुढील तपासात ऋषिकेश सखाराम गायकवाड (वय 22, रा. दुधड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि एक विधीसंघर्ष बालक यांचा सहभाग उघड झाला.
आरोपींनी चौकशीत दिलेल्या कबुलीनुसार, दि. 13/12/2025 रोजी रात्री तिघांनी नियोजनपूर्वक मयत कृष्णा धनवडे याच्या घरी जाऊन तो एकटा झोपलेला असताना दोरीने गळफास देऊन हत्या केली, नंतर हातपाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत टाकले व मोटारसायकलवरून पाटेगावजवळील गोदावरी नदी पुलावरून मृतदेह पाण्यात फेकून फरार झाले.
या अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी सागर रामेश्वर केसापुरे, ऋषिकेश सखाराम गायकवाड आणि एका विधीसंघर्ष बालकाला निष्पन्न करून त्यांना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन पैठण येथे हजर केले आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विजयसींग राजपुत, सपोनि पवन इंगळे, पोउपनि महेश घुगे तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने बजावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार (पो.स्टे. पैठण) करत आहेत.
— पोलिसांच्या तत्परतेमुळे अंधारात गेलेला खून अवघ्या 48 तासांत उजेडात आला!