“३० चाकूहल्ल्यांनंतर पोलिसांचा अॅक्शन मोड; ‘पास-२०’ पथक रात्रीच्या गस्तीस सज्ज!”
छत्रपती संभाजीनगर, दि. २४ :
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २४ :- शहरात वाढत्या रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पाऊल उचलत ‘प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन स्पेशल स्क्वॉड’ (पास-२०) या विशेष पथकाची स्थापना केली आहे. एप्रिल महिन्यातील अवघ्या २२ दिवसांत ३० चाकूहल्ले, ३ खून आणि २ गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने निर्णय घेत २० सदस्यांचे विशेष पथक उभारले आहे. या पथकात अधिकारी, उपनिरीक्षक आणि अंमलदारांचा समावेश असून, त्यांचे कामकाज गुन्हे शाखेच्या देखरेखीखाली चालणार आहे.
हे पथक सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर कार्यरत राहणार असून, दररोज रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत शहरभर गस्त घालणार आहे. विशेषतः अवैध धंदे, दारू अड्डे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत.
पथकाच्या स्थापनेनंतर लगेचच कारवाई करत कॅनॉट प्लेस परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्याच्या वाहनातून ११ इंच लांबीचा चाकू जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकासाठी कर्मचाऱ्यांची निवड करताना त्यांच्या कामातील तत्परता, धावपळ करण्याची क्षमता आणि सतर्कता यांचा विशेष विचार करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पथक प्रभावी ठरेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
“गुन्हेगारांसाठी आता रात्री सुरक्षित नाही — ‘पास-२०’ची नजर शहरभर!”