२७ लाख लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी सुरू; 'आयकर' माहितीवरून आणखी ५० लाख महिलांना फटका शक्य!

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ६ ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू झाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या डेटावरून २६ लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जात आहे. २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिला, तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थींवर लक्ष केंद्रीत आहे.
राज्यभरातून २.५९ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. सुरुवातीस दरवर्षी ५४ हजार कोटींच्या खर्चाचा अंदाज होता. मात्र, अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. निवडणूक निकालांनंतर लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याचा टप्पा सुरू झाला आहे.
पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहन धारक, अन्य योजनांचे लाभार्थी, सरकारी नोकरीत असलेल्या महिला, तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले पुरुष लाभार्थी अपात्र ठरवले गेले. आता वयोगट आणि एकाच घरातील लाभार्थ्यांची यादी तपासली जात आहे. यामध्ये २६.३४ लाख महिलांचे लाभ बंद करण्यात येणार आहेत.
आजपासून सेवा-स्तरावर पडताळणी सुरू
उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यात २१ वर्षांखालील १६,०७८ महिला आणि एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या ८३,७२२ महिलांची यादी तयार झाली असून, त्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जात आहे.
- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
'आयकर माहिती'वरून ५० लाख महिलांना धक्का?
राज्य सरकारने आयकर विभागाकडे पत्रव्यवहार करून २.५ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी मागवली आहे. त्यानंतर योजनेत सहभागी असलेल्या सुमारे ५० लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचा आढावा (सद्यस्थिती):
एकूण अर्जदार महिला: २.५९ कोटी
सुरुवातीचा दरमहा खर्च: ३,८५५ कोटी
पडताळणीत आढळलेले अपात्र लाभार्थी: ४२.२८ लाख
सध्याचा दरमहा खर्च: ३,२२५ कोटी रुपय
'लाडक्या'साठी सरकारी कटौतीचा मोठा धोका, पात्रतेची कसून तपासणी सुरुच आहे…!