“हिंदी लादण्याचा डाव हाणून पाडला; मराठी जनतेचा विजय!”

सरकारने अखेर ‘तीन भाषा सक्ती’चे दोन जीआर रद्द केले; राज ठाकरेंनी दिला ‘लढा अजून संपलेला नाही’चा इशारा

“हिंदी लादण्याचा डाव हाणून पाडला; मराठी जनतेचा विजय!”

महाराष्ट्र वाणी न्युज

मुंबई दि २९ जून :- महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांना अखेर सरकारनं माघार घेतली असून, 'पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या सक्ती'चे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले आहेत. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या प्रचंड दबावामुळे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, यामागे जनआक्रोश आणि अस्मितेचा आवाज उभा राहिल्याचे स्पष्टपणे दिसते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विरोधात संघर्ष सुरू केला होता. या मुद्द्यावर पक्षविरहित मोर्चाची घोषणा होताच इतर अनेक राजकीय पक्ष, संघटना या आंदोलनात सहभागी होण्यास सज्ज झाले. जर हा मोर्चा निघाला असता, तर ‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीची आठवण ताजी झाली असती, असा विश्वास मनसेने व्यक्त केला.

राज ठाकरे यांनी यानंतर सरकारवर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत म्हटलं – “समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको, पण अशा प्रकारांना आता महाराष्ट्र सहन करणार नाही.” पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, “सरकारने लक्षात ठेवावं, जनतेनं हा निर्णय कायमचा रद्द झालाय असंच गृहीत धरलंय. आता कोणतीही ‘समितीगिरी’ खपवून घेतली जाणार नाही.”

राज ठाकरेंनी मराठी जनतेच्या जागृतीचं कौतुक करत, “यावेळी मराठी मनांचा राग एकवटलेला दिसला, हा राग पुन्हा पुन्हा दिसायला हवा,” असं सांगितलं.

मराठी जनतेचा लढा हा केवळ भाषेचा नव्हता, तर अस्मितेचा होता… आणि तो लढा यशस्वी ठरला

 ‘हिंदी’ लादण्याच्या विरोधात उठलेला ‘मराठी आवाज’ एकवटला – आणि जिंकलाही!