स्कोडा कार बनली दारू वाहतुकीचे साधन! बिडकीन पोलिसांचा सापळा; ५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्कोडा कार बनली दारू वाहतुकीचे साधन! बिडकीन पोलिसांचा सापळा; ५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्कोडा कार बनली दारू वाहतुकीचे साधन! बिडकीन पोलिसांचा सापळा; ५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि ५ :- अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बिडकीन पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्कोडा कारमधून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजू तडवी हे पथकासह चितेगाव परिसरात अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत स्कोडा कारमधून विनापरवाना देशी दारूचा साठा पैठणखेडा मार्गे चितेगावकडे नेला जात असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास पैठणखेडा येथील जेतपूर-चितेगाव-इमामपूरवाडी फाटा रस्त्यावरील टी-पॉइंटवर पंचांसह सापळा रचला. संशयित स्कोडा कार येताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली. यावेळी कारचालक अजिंक्य पांडुरंग गिरी (वय २४, रा. ज्ञानेश्वरनगर, चितेगाव, ता. पैठण) याच्याकडे अवैध देशी दारूचा मोठा साठा आढळून आला.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल :

- १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे भिंगरी संत्रा देशी दारूचे ३० बॉक्स (प्रत्येकी १८० मिलीच्या ४८ सीलबंद बाटल्या).

- १५ हजार रुपये किमतीचे भिंगरी संत्रा देशी दारूचे ३ बॉक्स (प्रत्येकी ९० मिलीच्या १०० सीलबंद बाटल्या).

- ४ लाख रुपये किमतीची स्कोडा रॅपिड कार (क्रमांक MH-26-AK-6007).

अशा प्रकारे एकूण ५ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार योगेश कचरू नाडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (क), (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी राजू तडवी, पोलीस हवालदार योगेश कचरू नाडे, वाजेद शेख आणि वाल्मीक निकम यांनी केली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित