सिल्लोड पंचायत समितीतील आमसभेत विकासाचा धडाका; रखडलेली अनुदाने तातडीने देण्याचे आमदार अब्दुल सत्तार यांचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि १३ :- येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आमसभा दिनांक 12 रोजी यशस्वीरीत्या पार पडली. या आमसभेत सिल्लोड तालुक्यातील विविध गावांच्या मूलभूत समस्या, सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा आढावा तसेच आगामी विकासात्मक आराखड्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील विहीर व घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावीत, सातबारा उताऱ्यावर विहिरींची नोंद घ्यावी, तसेच गायरान जमिनीवरील घरकुल लाभार्थ्यांच्या जागा त्यांच्या नावावर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
या आमसभेत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगारनिर्मिती आणि शेतकरी प्रश्न यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व नागरिकांनी आपली मते मांडली. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
— सिल्लोडच्या विकासाला दिशा देणारी ही आमसभा, आता अंमलबजावणीवर सर्वांचे लक्ष!