सहकारी संस्थांना पुरस्कार; दि.३१ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२८ जुलै :- राज्य शासनाकडून सहकारी संस्थाकरीता सहकार पुरस्कार २०२३-२४ देण्यात येणार असून त्यासाठी दि.१८ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. आता ही मुदत दि.३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील संस्थांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.
सन २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रामार्फत ‘आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र राज्य हे सहाकारचे एक प्रमुख अंग व स्त्रोत आहे. राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकारी संस्थांची निवड करण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने दिला आहे.
*पुरस्काराचे स्वरुप*
सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ या गटांत एकूण ४५ संस्थाची निवड होणार असून सहकार महर्षी पुरस्कार – १, सहकार भूषण – २१, तसेच सहकार निष्ठ – २३ असे एकूण ४५ संस्थाना पुरस्कार देण्यात येणार असून, अनुक्रमे १ लाख रुपये, ५१ हजार रुपये,२५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या सर्व पुरस्काराचे स्वरुप आहे.
*पुरस्कारासाठी मूल्यमापन*
संस्था प्रकारनिहाय नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक, व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशेष निकाषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेतसाठी दिलेले योगदान, सहकार, चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक प्रयोजनासाठी केलेल्या मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी पात्र संस्थांची अंतिम निवड शासनस्तरीय समितीमार्फत दि.२६ सप्टेंबर पर्यंत होईल. तरी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यातील सहकारी संस्थांनी आपले प्रस्ताव दि.३१ पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करावेत. पुरस्काराशी संबंधित अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakaraukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील संस्थांनी आपले प्रस्ताव द्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.