सराईत घरफोड्या जेलबंद; 4 घरफोडीचे गुन्हे उघड – 3.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

सराईत घरफोड्या जेलबंद; 4 घरफोडीचे गुन्हे उघड – 3.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- वैजापूर व गंगापूर तालुक्यात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत सराईत घरफोड्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून ३ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर सुरू होता. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी गंगापूर तालुक्यातील अंतापुर येथील दऱ्या बरांड्या भोसले (वय 35, मजुरी) याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीने त्याचा साथीदार गुंठ्या उर्फ स्वरूप डिस्चार्ज काळे याच्यासह वैजापूर तालुक्यातील खंडोबा नगर, हडसपिंपळगाव तसेच गंगापूर तालुक्यातील साजराबाद व संजरपूर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. या प्रकरणात वैजापूर व गंगापूर पोलीस ठाण्यातील एकूण 4 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल (MH 20 EP 6236) असा एकूण 3,56,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपासासाठी वैजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत व त्यांच्या पथकाने केली आहे.

👉 घरफोड्यांना चाप लावत पोलिसांचा धडाका – नागरिकांनी सतर्क राहावे!