समृद्धी महामार्गाचे ‘जीवनदूत’ — पोलीस व सुरक्षा जवानांना प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षण

समृद्धी महामार्गाचे ‘जीवनदूत’ — पोलीस व सुरक्षा जवानांना प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षण
समृद्धी महामार्गाचे ‘जीवनदूत’ — पोलीस व सुरक्षा जवानांना प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १५:- असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया (ASI) यांच्या वतीने डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी महामार्गावर कार्यरत पोलीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान तसेच जलद प्रतिसाद पथक (QRV) यांच्यासाठी प्रथमोपचाराचे सखोल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

अपघातग्रस्त व्यक्तीला सुवर्णकाळात (Golden Hour) योग्य मदत कशी द्यावी, सीपीआर देण्याची अचूक पद्धत तसेच त्याआधी घ्यावयाची काळजी याबाबत ABCD पद्धतीनुसार प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये A – Airway (श्वासमार्ग मोकळा आहे का), B – Breathing (श्वसन सुरू आहे का), C – Circulation (रक्तस्त्राव व रक्तप्रवाह), आणि D – Disability (शुद्धी व मेंदूची स्थिती) या बाबींचा सविस्तर समावेश होता.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान कर्तव्यावर असताना प्रवाशांना वाहनाचा वेग, महामार्गावरील आपत्कालीन सुविधा तसेच प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत सातत्याने समुपदेशन करत असतात. यामुळे रस्ता संमोहनामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजीता अग्निहोत्री यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांना प्रमाणपत्रे देऊन त्यांना ‘समृद्धी महामार्गाचे जीवनदूत’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी अभियंता श्री. खलसे, डॉ. निखील चव्हाण, महामार्ग विभागीय अधिकारी आशिष फरांदे तसेच मुख्य सुरक्षा अधिकारी दिलीप जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

वेळीच मिळणारी योग्य मदतच अनेकांचे प्राण वाचवते — आणि समृद्धी महामार्गावरील हे ‘जीवनदूत’ त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहेत.