“सत्तेचा अहंकार की जनतेचा संताप? – रघुनाथ दादा पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि ७ :- सत्तेच्या जोरावर माणुसकीच्या सीमा ओलांडल्या जात असतील, तर त्याचा परिणाम थेट जनतेच्या मनावर होतो, असा परखड इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांचे वर्तन जेव्हा संवेदनशीलतेपासून दूर जाऊ लागते, तेव्हा त्यांच्या विषयीचा विश्वास डळमळीत होऊ लागतो, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
रघुनाथ दादा पाटील यांच्या मते, सामान्य जनता जरी मूकपणे सर्व घडामोडी पाहत असली, तरी ती प्रत्येक गोष्टीची नोंद आपल्या मनात घेत असते. अन्याय, अत्याचार आणि क्षुद्र राजकारणामुळे जनतेत नाराजी वाढत जाते. हीच नाराजी पुढे सत्ताधाऱ्यांविरोधात मोठ्या जनभावनेत परिवर्तित होते.
ते पुढे म्हणाले की, सत्ता ही कधीही चिरकाल टिकणारी नसते. सत्तेच्या कवचामागे लपून केलेले कपट, अन्याय आणि द्वेष एक दिवस उघडकीस येतातच. त्या वेळी सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कृतींचे परिणाम भोगावे लागतात.
सत्तेच्या काळात निर्माण केलेले संघर्ष, पेरलेला द्वेष आणि दिलेल्या जखमा याच पुढे अक्राळविक्राळ रूप घेऊन समोर येतात. सत्ता गेल्यानंतर उरते ती फक्त सत्ताधाऱ्यांची नकारात्मक प्रतिमा आणि जनतेच्या मनातील असंतोष, असेही रघुनाथ दादा पाटील यांनी नमूद केले.
सत्तेच्या मखरात सजवलेला दिखाऊ थाट काही काळ टिकतो, मात्र शेवटी जनतेच्या मनावर कोरली जाते ती कार्यकाळातील खरी प्रतिमा—ती सकारात्मक की नकारात्मक, याचा निर्णय जनता घेत असते.
“सत्ता येते-जाते, पण जनतेचा न्याय कायम स्मरणात राहतो!”