सईदा कॉलोनीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; लहान मुलांवर हल्ल्याची भीती, नागरिक भयभीत!

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १३ :– जटवाडा रोडवरील सईदा कॉलोनी आणि जफर पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः धुमाकुळ सुरु असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गल्लीबोळात वसाहतींमध्ये हे कुत्रे उगाच फिरत, पळापळ करत आणि लोकांवर भुंकत आहेत. विशेषत: लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, गेल्या दोन महिन्यांपासून कुरेशी समाजाचा हरताळ सुरु असल्याने हे कुत्रे उपासमार सहन न करता पिसाळल्यासारखे वागत आहेत. काही ठिकाणी तर त्यांनी मुलांच्या मागे धाव घेतल्याच्या घटना घडल्या असून, नागरिकांनी वेळीच मनपाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
रात्रीच्या वेळी गटागटाने भटकणारे हे मोकाट कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर, पादचाऱ्यांवर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महिलांना आणि शाळकरी मुलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या प्राणी नियंत्रण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ सईदा कॉलोनी व जफर पार्क (नसीर मस्जीद) परिसरातील या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.
"उपाययोजना न झाल्यास कुत्र्यांचा उच्छाद नागरिकांसाठी नवा संकटकाळ ठरू शकतो!"